वाद – एकांकिका

टीप: आगाऊ लेखी परवानगीशिवाय या एकांकिकेचे कोणीही प्रयोग करू नये. तालिमींना प्रारंभ करण्यापूर्वी परवानगी, प्रयोग मूल्य आणि योग्यता प्रमाणपत्र क्रमांक यासाठी अमोल बिराजदार यांना centraltheatre.in@gmail.com वर संपर्क करावा.

पात्रे :

  • सामान्य माणूस (मध्यमवयीन, थोडे टक्कल अपेक्षित)
  • समाजवाद (स्त्री/पुरुष)
  • मानवतावाद (पुरुष)
  • साम्यवाद (पुरुष)
  • भांडवलवाद (स्त्री/पुरुष)
  • राष्ट्रवाद (पुरुष)
  • आतंकवाद (पुरुष)
[पडदा उघडतो तेंव्हा एक इसम (सामान्य माणूस) आरामखुर्चीवर पहुडलेला असतो. हातात कुठलंसं पुस्तक, त्याच्या वाचण्याची पद्धत व अधून मधून खुद्कन येणाऱ्या हास्यावरून, ते कुठलंतरी विनोदी कथांचं पुस्तक असावं असा अंदाज. खोलीची एकंदरीत अवस्था पाहता, तो निम्नमध्यमवर्गीय असावा. पुस्तक वाचता वाचता त्यात अगदी गुंग होतो. तेव्हढ्यात दाराची बेल वाजते. दुर्लक्ष्य. पुन्हा बेल वाजते. मग इच्छा नसतांना नाईलाजाने.]

सा. मा.: दार उघडच आहे

[दारातून एक व्यक्ती आत येते, चारही बाजूंना नजर फिरवते, आणि “हम्म्म” म्हणून तशीच उभी राहते.]

सा. मा.: तुम्ही कोण? जनगणना वाले का? बरं ऐका, मी सामान्य मध्यमवर्गीय माणूस, इथे मी एकटाच राहतो, कारण माझं म्हणावं असं कुणीच नाही.

व्यक्ती: ओह अच्छा, आम आदमी?

सा. मा.: ओ..! शिव्या द्यायचं काम नाही, सांगून ठेवतो. आणि तुमचं झालं असेल मोजून तर या आता.

[परत पुस्तकाकडे वळणार तेवढ्यात.]

व्यक्ती: अहो पण मी जनगणना वली नाही.

सा. मा.: (जागेवरून उठत) मग कोण?

व्यक्ती: मी समाज…

सा. मा.: (मधेच तोडत) काय समाजसेविका? हम्म, दिसतयच ते. आजकाल ट्रेंडच आहे ना, तुमच्यासारख्या मुलामुलींनी कुठल्याश्या सामाजिक कार्याचं ढोंग करणाऱ्या एख्याद्या NGO मध्ये नोकरी करायची, गलेलठ्ठ पगार मिळवायचे आणि तरीही स्वतःला समाजसेवक म्हणवून घ्यायचं. भले तुमच्या कामाचा समाजाला काही उपयोग होवो वा ना होवो.

व्यक्ती: अहो पण मी..

सा. मा.: (पुन्हा मध्येच तोडत) हे बघा बाई, मी काही एवढा श्रीमंत नाही कि तुमच्यासारख्या बनावटी हेतूंना वर्गणी देऊ शकेल. (हात जोडत) या तुम्ही.

व्यक्ती: पहिली गोष्ट, महिना सतरा हजार उत्पन्न, एक दुचाकी आणि राहती खोली पाहता, तुम्ही देशातल्या ब्याऐंशी टक्के लोकांपेक्षा श्रीमंत आहात, तेंव्हा गरीब असल्याचं ढोंग करू नका. आणि दुसरी गोष्ट म्हणजे, मी इथे काही देणगी किंवा वर्गणी मागायला आले नाही आणि तुम्ही म्हणता तशी मी समाजसेविका पण नाही

सा. मा.: ( बावचळून, थोडा भानावर येत) मग तुम्ही कोण? आणि इथे का आलात?

व्यक्ती: मी समाजवाद, तुम्हाला सामील करून घ्यायला आलीये.

सा. मा.: (तिच्या भोवताली फिरत, अश्लील नजरेनं तिला वरून खालपर्यंत डोळे वटारून पहात.) दस्तुरखुद्द समाजवाद!

समाजवाद: हे काय करताय?

सा. मा.: (खजीलपणे हसत) ह्या ह्या! काही नाही, काही नाही. तुमच्या नेताजींच्या म्हणण्याप्रमाणे, “लडके हैं, लडकोसे गलती हो जाती हैं”

समाजवाद: (खेकसत) ओ, मी काही तो फक्त नाव लावून फिरणारा पोकळ विचारसरणीचा राजकीय पक्ष नव्हे, मी आहे खरा समाजवाद.

सा. मा.: बरं. आणि तुमच्यात सामील होऊन काय देशाचा उत्तर कोरिया करायचाय की व्हेनेझुएला?

समाजवाद: नाही हो, तो खरा समाजवाद नाही. खरा समाजवाद अजून तुम्हाला कळलेलाच नाही.

सा. मा.: अस्सं? मग तुम्ही समजवा.

समाजवाद: हो. पण तुम्ही माझं नाव आलं की दर वेळेस उत्तर कोरिया किंवा व्हेनेझुएला सारखे नावच का घेता? माझं खरं रूप तुम्हाला डेन्मार्क, नॉर्वेमध्ये पाहायला मिळेल.

सा. मा.: हो ना? बरोबर आहे, सामान्य माणूस म्हटलं की तो गाढवच असणार असा सर्वांचाच समज आहे, तुमची काही चूक नाही.

समाजवाद: असं का म्हणताय?

सा. मा.: अहो मला काही माहिती नाही का? हे डेन्मार्क, नॉर्वे भांडवलशाही अर्थव्यवस्थेवर चालतात, तिथे फक्त काही निकडीच्या सुविधांसाठी समाजवादी पद्धतीचा उपयोग केला जातो आणि फक्त तेव्हढ्यासाठी जवळजवळ साठ टक्के आयकर आकारला जातो. का खोटं बोलताय?

समाजवाद: तुम्ही लोक ना, कुणाच्याही सांगण्याबोलण्यात येता. अरे मला नीट समजून घ्या, माझा स्वीकार करा, माझ्या तत्वांचे अनुसरण करा आणि स्वतःच पहा, हा समाजवाद तुमच्यासाठी किती फायद्याचा आहे.

सा. मा.: असं म्हणता? बरं मग मला पटवून द्या, कदाचित करेल मी विचार तुम्हाला फॉलो करण्याचा.

समाजवाद: आता बघा, पेट्रोल, डिझेलचे भाव आभाळाला भिडलेत. काही दिवसांपूर्वी डाळी विकत घेण्यासाठी तुम्हाला अर्धी पगार द्यावी लागत होती. महागाई अशी वाढत चाललीये की काही दिवसातच तुम्ही या खोलीचं भाडं सुद्धा नाही देऊ शकणार. पार रस्त्यावर याल, रस्त्यावर. आणि या महागाईविरोधात तुम्ही कितीही धरणे आंदोलनं केली तरी तुमचं सरकार काही करू शकत नाही.

सा. मा.: आता यात सरकार तरी काय करणार? भाव काय त्यांच्या हातात थोडच आहेत.

समाजवाद: तेच तर, या महागाईचे कारण, सगळ्या वस्तूंच्या किमती बडे धंदेवाले किंवा बडे दलालांच्या हातात आहेत. मी तर म्हणते, नुसत्या मालाच्या किंमतीच नव्हे तर तुमचं सरकारसुद्धा या मोठमोठ्या उद्योगपतींच्या खिशात आहे.

सा. मा.: बरं, मग यावर तुम्ही काय करणार?

समाजवाद: या उद्योगमहर्षींचा एकाधिकारपणा संपुष्टात आणणार, सर्व उद्योगधंदे सरकारच्या अधिपत्याखाली आणणार.

सा. मा.: ते सर्व ठीक, पण यात माझा काय फायदा?

समाजवाद: तुमच्या गरजेच्या सर्व वस्तू तुम्हाला हव्या त्या किमतीत मिळणार.

सा. मा.: (उत्सुकतेने) वा वा! ऐकायला खूप छान वाटतंय. अजून सांगा.

समाजवाद:  देशात कधीच आर्थिक मंदी येणार नाही, कुणालाच शिक्षणासाठी किंवा इलाजासाठी पैसे मोजावे लागणार नाही.

सा. मा.: (अति उत्सुकतेने) वा अजून?

समाजवाद: कुणीच तुमचा हक्क हिरावून घेऊ शकणार नाही. जेवढी तुमची लायकी त्याचा पुरेपूर मोबदला तुम्हाला मिळेल.

सा. मा.: बस बस. पुरे, अजून जास्त ऐकलं तर मी आनंदाने वेडा होईल. मी तयार आहे.

[तिसरा इसम, भडक रंगीबेरंगी कपडे घातलेला,अचानक स्टेजवर येतो.]

इसम: अरे अरे अरे. थांब, असं लगेच काय तयार आहेस? कुठल्याही गोष्टीची शहानिशा केल्याशिवाय?

सा. मा.: अरे ए चट्ट्याबट्ट्या, पण तू आहेस कोण? आलास कुठून आणि मी का ऐकू तुझं?

इसम: मी मानवतावाद,

सा. मा.: ह्या ह्या ह्या (मोठयाने हसतो), असा कसा मानवतावाद? अरे मानवतावाद म्हटलं तर कसं चित्र उभं राहतं डोळ्यासमोर, पांढरा सादर, पांढरी पॅन्ट, चेहऱ्यावर कांती, डोळ्यात शांती. अन नाहीतर तू, चट्ट्याबट्ट्या.

मानवतावाद: अरे आम्ही अपग्रेड झालोय

सा. मा: हे असं?

मानवतावाद: मग काय, जेंव्हा आम्ही पांढऱ्या कपड्यात शांतीने तुमचा उद्धार करायचो तेंव्हा तुम्हाला मी बोअर वाटत होतो. तुमचं कसं आहे ना, गाढवापुढे वाचली गीता…. नाही म्हणजे, तुमच्यापुढे वाचली गीता, वाचणाराच गाढव होता. म्हणून आम्ही आता असे झालो आणि एंटरटेनमेंट करत, तुम्ही कसे का असेना तुमचं भलंच करतो.

सा. मा.: असेल असेल, पण तू होतास कुठे, आलास कुठून आणि मी का ऐकू तुझं?

मानवतावाद: मी नेहमीच इथेच असतो फक्त माझी कोणी दखल घेत नाही.

सा. मा.: बरं मग आता तरी मी का घेऊ? तुझी दखल?

मानवतावाद: कारण मी तुझा हितचिंतक आहे, तुझ्या फायद्याचंच सांगतोय.

सा. मा.: कसलं काय फायद्याचं? फायद्याचं तर यांनी सांगितलंय. (समाजवादाला) तुम्ही लक्ष नका देऊ यांच्याकडे मी तयार आहे सामील व्हायला.

[मानवतावाद अंधारात गुडूप होतो/ त्याच्या जागी जातो.]

समाजवाद: या तर मग. सामील व्हा.

[सामील होण्याचा प्रतीकात्मक सोहळा. संगीत. समाजवादी अर्थव्यवस्थेची सुरुवात.]

सा. मा.: (फोनवर) हॅलो, डॉ. बत्रा, मी सामान्य, माझी अपॉइंटमेंट होती आजची.

डॉ. बत्रा.: (विंगेतूनच) कसली?

सा. मा.: अहो कसली कायविचारताय? केशारोपणाची, हेअर ट्रान्सप्लांट. (केसातून हात फिरवत, आरशाकडे पाहत)

डॉ. बत्रा: सरकारने तो विभागाचं बंद केलाय. तुमची अपॉइंटमेंट गेली खड्ड्यात, ठेवा फोन. (फोन आपटण्याचा आवाज)

सा. मा.: (फोनकडे बघत, धक्का बसल्यासारखे) हे काय नवीन?

समाजवाद: यात नवीन काय? कुणाला गरज नव्हती.

सा. मा.: (टकलाकडे बोट दाखवून) पण मला आहे ना.

समाजवाद: ती तुझी गरज नाही, तुझी इच्छा आहे.

सा. मा.: मग इच्छा असू नयेत?

मानवतावाद: असाव्यात, असल्या तरी हरकत नाही. पण त्या पूर्ण तेव्हाच होतील जेंव्हा यांचं सरकार ठरवेल.

सा. मा.: (समाजवादाला) आणि तुमचं सरकार केंव्हा ठरवेल की माझ्या डोक्यावर केस उगवले पाहिजे?

समाजवाद: जेंव्हा संपूर्ण समाजाला त्याची गरज भासेल.

सा. मा.: मग काय मी आता सगळ्या दुनियेचे केस उपटू का जाऊन?

समाजवाद: (गप्प)

सा. मा.: अहो एक व्यक्ती म्हणून माझं काही अस्तित्व आहे की नाही? की तुम्ही मेंढपाळ आणि आम्ही कळपातली मेंढरं. जे कळपाचं होईल तेच आमचं भवितव्य?

समाजवाद: संपूर्ण समाजाच्या एकत्रित विकासासाठी ते गरजेचं आहे.

सा. मा.:  कसला डोमल्याचा विकास? एक तर तुम्ही माझा पगार हिरावून घेतला, त्याचा अर्धा भत्ता देता. त्यात कुठली इच्छा पुरवणं आधीच कठीण, त्यात कुठला मनुष्य प्रयत्न करतोय तर त्यावरही तुमची गदा?

समाजवाद: उत्पन्न कमी, पण माझ्यामुळे महागाई पण कमी झाली ना.

सा. मा.: हो, झाली ना. पण दर्जा? कपड्यांच्या जागी आम्हाला या चिंध्या वापराव्या लागताहेत, खाद्यतेलाच्या नावावर गटारीचं पाणी मिळतं, सगळ्या वस्तू, सुविधांची पत इतकी घसरलीये की काहींच्या वापरामुळे आमचे आयुर्मान कमी होतेय तर काहींमुळे जगण्याची इच्छा.

समाजवाद: सगळं काही तुमच्या इच्छेनुसार होणं कसं शक्य आहे?

सा. मा.: सगळं? अरे काहीही माझ्या इच्छेनुसार होत नाहीये. मला नोकरी सरकार म्हणेल तिथे करावी लागतेय, मला राशन ते म्हणतील तेवढंच मिळतंय. मला माझे राहणीमान निवडण्याचा हक्क नाहीये, मला कुठल्याही बाबतीत तक्रार करण्याची मुभा नाहीये, आणि तक्रार करूनही काय फायदा, कारण कुठल्याही वस्तूला व स्थितीला दुसरा पर्यायच नाहीये. मी आठ ऐवजी सोळा तास काम करूनही मला पूर्वीसारखा मोबदला मिळत नाही, एवढंच काय तर पोटभर अन्न बनवता येईल एवढं राशनसुद्धा मिळत नाही.

समाजवाद: तुम्हाला आधीच बजावलं होतं, तुमची जेवढी लायकी तेवढंच मिळेल.

सा. मा.: आणि हे ठरवणार कोण? तुमचं अकार्यक्षम नालायक सरकार? (ओरडत, रागात) नाही, आता पुरे झाला हा अत्याचार, नाही सहन होत आता.

[समाजवाद जायला निघते, जाता जाता सामान्य माणसाच्या घराच्या सेटमधला अर्धा भाग सोबत ओढत नेऊ लागते.]

सा. मा.: हे काय? माझं घर कुठे घेऊन चाललात? का?

समाजवाद: तुमची एवढ्या मोठ्या घरात राहायची लायकी नाही, म्हणून.

[सामान्य माणूस समाजवादाला घर नेण्यापासून थाम्बवण्याचा प्रयत्न करतो. समाजवाद त्याच्या पेकाटात लाथ घालून, अर्ध्या घराचा सेट घेऊन विंगेत निघून जाते. सामान्य उठून हताश मुद्रेने खुर्चीत जाऊन बसतो, तेवढ्यात.]

मानवतावाद: (डोकावत) म्हणालो होतो, कुठलीही विचारधारा असो वा अर्थव्यवस्था त्याचा स्वीकार करण्याआधी सखोल अभ्यास कर.

सा. मा.: (खेकसत) ए तू जा रे.

[मानवतावाद परत गायब. सामान्य परत आपल्या मूळ हताश मुद्रेत, दोन्ही पाय खुर्चीवर घेऊन डोकं दोन्ही हातात धरलेलं. तेवढ्यात एक इसम चालत आत येतो. अंगात लाल सदरा पायजमा, थोडी दाढी वाढलेली, खांद्याला शबनम लटकवलेली. सामान्य डोकं वर करून त्याच्याकडे बघतो. आता हतबलपणा आणि प्रश्नचिन्ह असा मिश्र भाव आहे. तो इसम आत येऊन सामान्यांच्या समोरच्या खुर्चीत बसतो, दाढी खाजवत शबनम मधून एक व्होडक्याची बाटली आणि एक सिगार काढून समोरच्या टीपॉयवर ठेवतो, मग हातपाय पसरून सामान्यकडे बघतो.]

सा. मा.: अरे काय चाललंय हे. कोण तुम्ही?

इसम: (सर्वश्रुत असल्याचा भाव आणून) अरे मी, साम्यवाद.

सा. मा.:  (थोडा रागातच) हो का? तुमची बहीण येऊन गेली. (उभा राहून) माहेरवाशीण पोरीसारखी घर भर नाचली, होते नव्हते नेले एवढी भिंत मात्र वाचली (भिंतीकडे बोट करत). आता तुम्ही काय न्यायला आलात?

साम्यवाद: (बाटलीकडे इशारा करत) मी तर द्यायला आलोय.

सा. मा.: असच काहीतरी म्हणून सुरुवात केली होती तिने. तिचा सगळं पटलं सुद्धा होतं मला.

साम्यवाद: तिच्याशी माझंच पटत नाही, तुमचं कसं पटलं?

सा. मा.: खाल्ली माती, झाली चूक. सगळं घेऊन गेली, आणि माझी लायकी पण काढून गेली.

साम्यवाद: (घरावर नजर मारत, स्वगत) सगळं नाही काही.

सा. मा.: काय म्हणालात?

साम्यवाद: नाही, आम्ही कुणाची लायकी नाही काढत. आमच्यासाठी सगळे सारखे, मग तुम्ही असो वा अंबानी.

सा. मा.: (चेहरा थोडासा खुलतो) काय बोलताय?

साम्यवाद: (बाटलीकडे नजर करत बसायचा इशारा करतो) चला या सांगतो.

[सामान्य खुर्चीकडे जाऊ लागतो.]

मानवतावाद: (अंधारातून डोके बाहेर काढत) अरे परत फसशील, नको जाऊ

[सामान्य काहीतरी फेकून मारण्याची मुद्रा घेतो, तास मानवतावाद परत गुडूप होतो. सामान्य खुर्चीत येऊन बसतो आणि बाटलीचं झाकण उघडून प्यायला सुरुवात करतो.]

साम्यवाद: सर्वकाही सरकारच्या हाती का द्यायचं? सगळं जनतेच्या मालकीचं असलं पाहिजे. प्रत्येक वस्तूवर सर्वांचा सामान हक्क. राष्ट्रपती भवन असो वा अंटालिया या सर्व सार्वजनिक मालमत्ता असल्या पाहिजेत, सरकारच्या किंवा कुणा एका उद्योगपतीच्या मालकीच्या नकोत.

सा. मा.: (पिण्याच्या नादात) ह्म्म्म, बरोबर.

साम्यवाद: जात, धर्म, काळा, गोरा, गरीब, श्रीमंत, शिक्षित, अशिक्षित असा सगक भेद मिटवून सगळ्यांना एकाच नजरेनं पाहिलं पाहिजे.

सा. मा.: (आपल्याच नादात) हो हो.

साम्यवाद: हे सगळं शक्य होण्यासाठी प्रत्येकाने आपली सगळी मालमत्ता अर्पण करून एकत्र आलेल्या सार्वजनिक मालमत्तेवरच आपलं गुजराण करायचं.

[हे ऐकतांना सामान्य अचानक थबकतो आणि साम्यवादाकडे पाहू लागतो. साम्यवाद टिपॉयवरची सिगार उचलतो, उठतो, खिशातून लायटर काढतो. लायटर काढता काढता त्याच्या खिशातली पिस्तूल खाली पडते. पिस्तूल पाहून आधीच थबकलेला सामान्य अजूनच घाबरतो. साम्यवाद सिगार पेटवतो, पिस्तूल उचलतो, एकदा पिस्तुलीकडे आणि एकदा सामान्याकडे नजर टाकतो, पिस्तूल खिशात ठेवतो आणि खुर्चीवर परत बसतो.]

साम्यवाद: सामाजिक आणि आर्थिक विषमता दूर करण्यासाठी हे पाऊल उचलणे गरजेचे आहे. (झुरका मारतो)

सा. मा.: (घाबरत) पण हे पिस्तूल कशासाठी?

साम्यवाद: हूँ, हे होय? (सिगार सामान्यच्या हातात देतो, खिशातुन पिस्तूल काढतो, सामान्यच्या दिशेने धरतो. सामान्य आवंढा गिळतो व झुरका मारतो) त्याचं असं आहे की ज्यांच्या हातात पैसे आहे पॉवर आहे ते सहजासहजी टाकून देत नाहीत. कधी संवादाने तर कधी बंदुकीने ते करवून घ्यावं लागतं.

[सामान्य घाबऱ्या नजरेनं सैरभैर बघतो. साम्यवाद बाटलीचे झाकण लावून शबनममध्ये टाकतो, सामान्यच्या हातून सिगार घेऊन, विझवून ती पण शबनममध्ये टाकतो आणि उठतो. तो जातोय हे बघून सामान्य सुटकेचा निःश्वास टाकत उठतो. साम्यवाद कपाटातील कापड, इतर सामान उचलतो, खुर्चीवर टाकून खुर्च्या ओढत नेऊ लागतो.]

साम्यवाद: एवढ्या सगळ्या अतिरिक्त वस्तूंची तुला गरज नाहीये. (हसत) बघ, मी तुझी लायकी नाही काढली फक्त तुझी गरज पहिली.

[साम्यवाद सामान घेऊन निघून जातो. सामान्य तो जाईपर्यंत अवाक होऊन त्याला बघत राहतो. तो जाताच]

सा. मा.: न्या, न्या सगळं न्या. (अंगावरची पॅन्ट काढतो, साम्यवाद गेलेल्या विंगेकडे फेकतो, ती स्टेजवरच पडते) हे पण न्या.

[साम्यवाद परत स्टेजवर येऊन ती पॅन्टसुद्धा घेऊन जातो.]

मानवतावाद: बघ मी म्हटलो होतो.

[सामान्य हताश,पलंगाला टेकून बसलेला. एक व्यक्ती उच्चभ्रू दिसणारी, मटकत मटकत येते. सगळीकडे नजर फिरवते, किळस आल्यासारखा भाव आणते. पलंगावर तीन-चार टिचक्या (प्रतीकात्मक सफाई) मारून पायाची घडी घालून बसते.]

सा. मा.: (केविलवाणा) आता तुम्ही कोण?

व्यक्ती: ज्याच्यावर जग चालतं आणि ज्याची साथ सोडल्यामुळे तुम्ही उध्वस्त व्हायला लागलात ती मी. मी भांडवलवाद.

मानवतावाद: या वेळेस तरी माझं ऐक.

सा. मा.: गप्प बस रे, तुझ्या नादी लागून माझं उदरनिर्वाह होणार आहे का? जा इथून.

[मानवतावाद खाली मान घालून परत अंधारात गुडूप]

सा. मा.: (भांडवलवादाला) तू नको होतीस म्हणून बाकी सर्वांचा जन्म झाला ना?

भांडवलवाद: पण ती केवढी मोठी चूक होती हे तुझी अवस्था पाहता लक्षात येतंय.

सा. मा.: ते ही खरंच, पण आता?

भांडवलवाद: परत या माझ्याकडे, काम करा, मोबदला मिळवा, स्वतः स्वप्न पहा, ती पूर्ण करण्याचा प्रयत्न करा, एकमेकांशी स्पर्धा करा, कुरघोडी करा, पुढे जा, स्वतःची संपत्ती बनवा, कोट्याधीश व्हा, ऐश करा.

सा. मा.: (स्वप्नवत) हो..

भांडवलवाद: चला तर मग लागा कामाला.

[भांडवलवाद पलंगावर पसरून बसते, सामान्य तिचे हातपाय दाबू लागतो. बराच वेळ सेवा आणि इतर काही काम करवून घेतल्यावर ती सामान्यच्या हातात एक नोट टेकवते.]

सा. मा.: हे काय? दहा रुपये? दिवसभराचे? आणि मी कोट्याधीश होणार? कसा?

भांडवलवाद: मागणीचा नियम गाढवा. एवढ्यातच शेकडो इतर मजूर मिळत असतांना, तुला जास्त का द्यावे? आणि मी कुठं म्हटलं सगळेच कोट्याधीश होतील म्हणून? जे एकमेकांवर कुरघोडी करून, त्यांचे हक्क हिरावून पुढे जाऊ शकतील तेच होतील. या भांडवलवादात टिकणं प्रत्येकाच्या ऐपतीचं नाही. Only the fittest can survive my boy.

[भांडवलवाद निघून जाते. सामान्य केविलवाण्या नजरेनं हातातल्या दहाच्या नोटेकडे बघत राहतो. एक चड्डीवाली व्यक्ती झेंडा उंचावत, राष्ट्रभक्तीपर गीत म्हणत, नारे देत स्टेजवर येते. त्याची नारेबाजी संपते आणि तो सामान्याकडे बघतो.]

सा. मा.: (आतापर्यंत पुरता विटलेला) तुम्ही जे कोणी असलं, मला तुमच्याशी काही कर्तव्य नाही. तुम्ही जा इथनं.

चड्डी: असं कसं? असं म्हणून कसं चालेल? अरे मी राष्ट्रवाद, या राष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला माझ्याशी कर्तव्यनिष्ठ असायलाच हवं.

सा. मा.: असेल हो, पण आता माझ्याकडे तुम्हाला देण्यासारखं काहीच उरलं नाही. (हातातली दहाची नोट लपवतो)

राष्ट्रवाद: काहीच कसं नाही? जीव आहे की.

सा. मा.: (घाबरत) काय?

राष्ट्रवाद: अरे देशासाठी एकदा जीव दिला तर काय मरणारेस का?

सा. मा.: (विचित्र नजरेनं) काय?

राष्ट्रवाद: (विषय बदलत) राष्ट्ररक्षणासाठी जीव जरी द्यावा लागला तरी ते कमीच, एक छोटंसं बलिदान. देशासाठी याहूनही मोठं काही करून दाखवण्याची तयारी हवी.

[राष्ट्रवाद चहुबाजुचा कानोसा घेत, “ते बघ, ते ऐक” करत सामान्यला ओढत स्टेजच्या चहूबाजूला फिरवतो. शेवटी स्टेजच्या मध्ये थांबून लांब पाहिल्यासारखे करत, जनावरासारखे रांगत,अजब हालचाली करत]

राष्ट्रवाद: दुश्मनांनी चहुबाजूने देशाला घेरलंय.

सा. मा.: (राष्टवादी सारख्या हालचाली करत) हो?

राष्ट्रवाद: (उभा राहत) देश संकटात आहे.

सा. मा.: (राष्ट्रवादच्या पायाला धरत) हो?

राष्ट्रवाद: आपल्याला याविरोधात लढा द्यावा लागेल?

सा. मा.: (पाय सोडत, वर पाहत) कुणाला?

राष्ट्रवाद: तुला आणि मला मिळून.

सा. मा.: (उभा) अहो मी सामान्य माणूस, मी काय लढा देणार.

राष्ट्रवाद: सामान्य असला म्हणून काय झालं? इथं देश संकटात आहे, अशी माघार घेऊन कशी चालेल?

सा. मा.: (थोडीशी चीड चीड) अहो काय संकट घेऊन बसलाय तुम्ही? कुठली संकटं? (सेन्टरच्या लेव्हलवर येऊन बसतो) सगळंकाही शांततेत तर चालू आहे. (थोड्या खालच्या सुरात) हां आता दंगली होतात कुठे कुठे, पण हल्ली कमीच लोक मरतात, शांत आहे सगळं. महागाई, दुष्काळामुळे होणाऱ्या उपासमारीने जीव जातात बरेच पण तरी सुरळीतच आहे हो. आता परवाचीच गोष्ट बघा ना, साऊथ मुंबईत बॉम्ब ब्लास्ट झाला पण नॉर्थ मुंबई सुरळीत चालू, कारण त्या बॉम्बमुळे पेटणाऱ्या आगीपेक्षा आमच्या पोटात पेटणारी आग आम्हाला जास्त भयानक वाटते. शांतताच आहे हो सगळीकडे.

[राष्ट्रवाद त्याच्यावर धावून जात. त्याच लेव्हलवर सामान्यच्या मानगुटीवर बसल्यासारखा.]

राष्ट्रवाद: शांतता? याला तुम्ही शांतता म्हणता? “देश तेरे तुकडे होंगे” म्हणणाऱ्यांची गॅंग तयार होतेय गल्लोगल्ली, ते बघ. (उठून) परराष्ट्रीय घुसखोर शरणार्थी बनून आपल्या देशात ठिय्या मांडू पाहतायत, तुम्ही काढा झोपा. विदेशी कंपन्यांचा व्यापार देशात वाढू लागलाय, तुम्ही करा त्यांची चाकरी.

सा. मा.: (हळूच) आमच्याकडे काही पर्याय नाही हो.

राष्ट्रवाद: इस्ट इंडिया कंपनीचं काय झालं?

सा. मा.: त्यांचं पुढं काय झालं याची कल्पना नाही पण …

राष्ट्रवाद: अरे त्यांनी पण असाच व्यापार मांडला, तुमच्यासारख्या लोकांनी केली त्यांची चाकरी, आणि गेला ना देश पारतंत्र्यात. देशाला परत पारतंत्र्यात घालवायचं? (सामान्य नकारार्थी मुंडकं हलवतोय). (ओरडून) घालवायचं का?

सा. मा.: (घाबरत) ओ नाही ओ. (सावरत, उठतो) अहो पण तुम्ही जे म्हणताय ते फार फार तर वादाचे विषय आहेत, संकटं नव्हेत.

राष्ट्रवाद: राष्ट्रद्रोह्यांसारखे बोलू नको. (ओरडून) राष्ट्रद्रोही.

सा. मा.: नाही हो, मी सामान्य माणूस.

राष्ट्रवाद: तरी पण राष्ट्रद्रोही. देश संकटात आहे, त्याविरोधात आपल्याला लढा द्यायचाय आणि त्यात तुम्हाला तुमचे योगदान द्यावेच लागेल.

सा. मा.: जरी हे मानलं तरी माझ्याकडे योगदान देण्यासारखं काही उरलं नाही हो. (बोलतांना जाऊन पलंगावर बसतो)

राष्ट्रवाद: (रागात, ओरडत) योगदान हे द्यावेच लागेल.

सा. मा.: (हिरमुसून, लपवलेली दहाची नोट काढतो, घडी उघडून दाखवत) हे एवढंच योगदान देऊ शकतो मी.

राष्ट्रवाद: (चिडून) चिल्लर चाळे, चिल्लर चाळे.

[सामान्यवर चाल करून जातो, त्याला जबरदस्ती पलंगावर आडवा करतो. त्याचे रक्त काढण्यासाठी सिरिंज व पिशवी लावतो. हे करत असतांनाच.]

राष्ट्रवाद: तुम मुझे खून दो, मैं तुम्हारा देश बचाऊंगा.

[रक्ताने भरलेली पिशवी काढून, सामान्यला तसाच सोडून, नारेबाजी करत निघून जातो. सामान्य उठून बसण्याचा प्रयत्न करतो. नुकत्याच झालेल्या उपासमारी व जबरदस्तीच्या रक्तदानाने क्षीण झालेला तो कसा बसा, कण्हत कुंथत उठतो. जाऊन एक बिस्कीट शोधून खात सेन्टरच्या लेव्हलवर बसतो.]

सा. मा.: रक्त घेऊन गेले आणि पार्ले जी पण नाही दिलं खायला.

[एक काळा सदरा, काळा पायजमा घातलेली किडमिडीत देहयष्टीची, डोक्याला काळा कपडा बांधलेली बंधूकधारी व्यक्ती, बंदूक ओढत ओढत स्टेजवर प्रवेश करते. सामान्य एकदा बंदुकीकडे, एकदा त्या व्यक्तीकडे बघत राहतो.]

काळा सदरा: मला तर ओळख करून द्यायची गरजच नाही, तरी सांगतो, मी आतंकवाद. आख्ख जग मला फक्त ओळखतच नाही तर माझं नाव ऐकूनच थरथरतं.

सा. मा.: तू पण मला सामील करून घ्यायला आलाय?

आतंकवाद: हो.

सा. मा.: आता तू पण तुझे फायदे मला सांगणार?

आतंकवाद: हो.

सा. मा.: (क्षीण, थकलेला, तरी रागात) प्रयत्न पण नको करू, मला माहिती आहे तू काय आहे. तू फक्त विध्वंसच अनु शकतो. तुझे काहीच फायदे नाहीत.

आतंकवाद: आतंकवाद म्हणजे पावर, सगळी दुनिया आमच्या समोर झुकते आणि तू म्हणतो फायदे नाही?

सा. मा.: अरे हट्ट. थोबाड बघितलं का स्वतःचं? भिकाऱ्यासारखे राहता, दिवसाआड कुत्र्यासारखे मारले जाता, अन पॉवर म्हणे.

आतंकवाद: अरे. ते जाऊदे, पण जेंव्हा आपले हक्क मागण्याचे, मिळवण्याचे इतर सर्व मार्ग बंद होतात, तेंव्हा आतंक हाच एक मार्ग उरतो.

सा. मा.: अजून भरपूर मार्ग आहेत रे बाबा. आणि हे बघ, तुझ्याशी वाद घालण्याएवढी माझ्यात ताकदही नाही, आणि माझी इच्छाही नाही.

आतंकवाद: वाद? हि बंदूक काय वाद घालायसाठी आणली असं वाटतं का तुला? पण चिंता नको करू, तुला गोळी नाही घालणार, या बोथट चाकूने हळू हळू वार करिन, मरण्याआधी इतका वेळ तडफडशील कि दोन-तीन जन्म तडफडण्यात गेले असं वाटल.

सा. मा.: पण का?

आतंकवाद: चुकीचा प्रश्न.  मुळात प्रश्न विचारानं तुझं कामचं नाही. फक्त मी सांगेन ते करायचं. आता उठ, आपल्याला हमल्याची तयारी करायचीय.

सा. मा.: माझ्याकडून ते शक्य नाही रे बाबा. मी एक अतिसामान्य माणूस आहे.

आतंकवाद: तुझे मत कोणी विचारले. चाल हमल्याच्या तयारीसाठी तुझी ट्रैनिंग चालू करू.

[सामान्यची ट्रैनिंग चालू होते, बराच वेळ चालते.]

आतंकवाद: आता पळत राहा मी येईपर्यंत. थांबला कि गोळी घालीन. जब तक तेरे पैर चलेंगे, तेरी सांसे चलेंगी.

[आतंकवाद विंगेत निघून जातो. सामान्य पळत राहतो. पळता पळता बेशुद्ध पडतो. लाईट्स फेड आऊट होतात. आतंकवाद परत येतो. सामान्यला बॉम्ब बांधतो. तो दिसू नये म्हणून पलंगवरची बेडशीट त्यावर झाकतो आणि पळून जातो. लाईट्स. तेथे समाजवाद साम्यवाद, भांडवलवाद आणि मानवतावाद येतात.]

साम्यवाद: मेला वाटतं.

समाजवाद: हो, मेलाय. ही बॉडी सरकारची आहे, सरकारी संशोधनासाठी या बॉडीचा उपयोग होणार.

राष्ट्रवाद: ओ, तुमचं सरकार गेलं खड्ड्यात, हा आमचा शहीद आहे. याला प्लास्टर करून आम्ही याचा पुतळा बनवणार.

साम्यवाद: अहो वेडे झालात का? ही बॉडी सगळ्या जनतेची आहे. ही सर्व जनतेमध्ये बरोबर वाटली गेली पाहिजे.

भांडवलवाद: नाही, नाही. या बॉडीचा लिलाव झाला पाहिजे, जो जास्त बोली लावेल बॉडी त्याची.

मानवतावाद: अरे एकदा बघा तरी तो जिवंत वाटतोय.

[समाजवाद, राष्ट्रवाद, साम्यवाद, भांडवलवाद चौघे मानवतावादकडे रागाने बघतात. त्याला धक्के मारून स्टेजवरून घालवून देतात. परत स्टेजवर चौघांचा वाद सुरूच राहतो, तोच बॉम्ब ब्लास्ट होतो.

चौघे खाली पडतात.

सामान्यचे (पुतळ्याचे) तुकडे पसरतात.

मानवतावाद परत येतो,

सगळी अवस्था पाहतो,

सामान्यचे तुकडे गोळा करतो,

त्याच्यासमोर मेणबत्ती लावून हताश चेहऱ्याने बसतो.

पडदा.]


Fill following details to download this article in PDF

Loading

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *