ई- स्क्वेअर शेजारी काकडे मॉल समोरील रिक्षा थांबा, पुणे
बोपोडी?
बोपोडी मधी कुठं?
पुणे आयटी पार्क.
हा बसा… मीटर पेक्षा ३० रुपय जास्त द्या …
का?
तिकडून प्यासेंजर मिळत नाही.
अहो तिथं असतात ना रिक्षा.. मिळत कसे नाहीत प्यासेंजर?
तेच सांगतो ना.. तिथं अगुदरच एवढ्या रिक्षा असत्यात .. आम्हाला काय मिळणार
असं थोडंच असतं राव.. तुम्ही मीटर वर कुठेही यायला पाहिजे.
चला बसा, फिनिक्स मॉल ला सोडतो, मीटर वर जायचंय ना?
नको.
आणखी एक दोन रिक्षा वाल्यांना विचारले पण त्यांनीही नकार दिला. मागे येउन एक जुनकट रिक्षा यायला तयार झाली. बसत असताना मी…
मीटर प्रमाणे ना?
हा. टारीफ कार्ड प्रमाणे, आपुन जास्त नाही घेणार.
टारीफ कार्ड कशाला? मीटर दाखवत आहेना पैसे.
नाही साहेब, हे बघा मीटर ११ दाखवताय, आता १७ झालंय, हे मीटर जुनं हे. अजून ३० दिवस बाकी हे मुदत मीटर बदलायची… अजून नाही जमलं मला.
बरं.. ठीक हे.
आत्ता काही दिवस झाले.. ५ हजार रुपये खर्च करून हे मीटर बसवलं… आता पुन्हा बदला म्हणी!.. ५०० रुपय खर्च हे. काय करायचं आता सांगा…
हंम..
पुणे आयटी पार्क मधी काम करता का तुम्ही?
हो..
तुमचं ते काम आमचं हे काम. हेहे.. तुमचं पण ८ तास डूटी असती पण कधी कधी १२ तासबि बसावं लागतंय. तव्हा तुम्हाला एवढा पगार मिळतो. हाई ना?
हो..
हाईत काई लोकं ओळखीचे तुमच्या आयटी पार्क मधी. सोडलेलं हे त्यांना मी. आपुन आख्या पुण्यामधी कुठही असुद्या कुठबी जाण्यासाठी नई म्हणत नई. आणि पैसे जे काई मी मीटरप्रमाणे होतील तेवढेच. काम हे आपलं ते. इमानदारीने केलं पाइजे.
हो ना.. बाकी तुमच्या रिक्षावाल्यांना हे का समजत नाही कळत नाही. बरीच जन जायला एक तर नको म्हणतात किंवा पैसे जास्त मागतात. काय आहे राव हे ..चूक करतात हि मानसं..
कसं हे साहेब.. कुठलंही काम म्हणल्यावर काई असी काई तसी मानसं असणारच. आता तुमच्या ऑफिस मदी पण तुमी बगा. काई लोकं मंजी एकदम टायमावर येणार, टाईमशीर काम करणार. तेंच कसं असतं, काम मंजी काम. आणि काई लोकं कटाळा करणार, त्यांना काम नई कराव वाटत.., खोटं बोलणार. तसंच आमच्या पेशातबी काई लोकं चांगली हेत काई लोकं वाईट हेत.
(मी थोडासा हसत)
हो.. खरंच आहे तुमचं.
कुठले साहेब तुम्ही?
मी अहमदनगर जिल्ह्यातला. मुंगी नावाचं गाव आहे पैठण शेजारी. तिथला.
हा.. नगर आणि अहमदनगर एकच नायका. काई नातेवाईक हाईत बरका नगर तालुक्यात आमचे.
तुम्ही कुठले?
आमि सातारा.
किती वर्षांपासून पुण्यात?
आता झाले जवळपास २० वर्षे.
कुठे राहता?
बाणेर.
स्वतःचं घर असेल मग आता तुमचं…
नाई स्वतःचं घर नाही घेतलं. तेवढंच राहिलं फक्त. बाकी सगळं जे करायचं होतं ते केलं. पोरांना शिकवलं. म्हणलं तुम्हाला बाकी काही नई पण शिक्षण देणार. शेवटी तेच तुमच्या कामाला येणार. मोठी मुलगी एम.कॉम. आहे. तिचं लग्न केलं. दुसऱ्या मुलीचं इंजिनीरिंग चा डिप्लोमा केला. मुलगा सेकंड यिअर ला आहे. मेकॅनिकल इंजिनीरिंग.
अरे वाह! भारीच.
(सिग्नल वरून राईट टर्न घेताना तिकडून एक कारवाला लाईन च्या बाहेर आला होता. त्याला उद्देशून)
बघा आता हे. असं केल्यावर कसं होणार. सगळ्यानला आपली गाडी बाहेर काढण्याची घाई. बाकीच्यांचं काहीका होईना. (कार वाल्याकडे बघून मोठ्या आवाजात) अरे काय? कुठं चालला? सरळ या ना.. आं? काई लोकांकड पैसा आला पण कसं वागावं याची अक्कल नई आली. तुम्ही घराचा विषय काढला म्हणून सांगतो. मला जर पैसाच कमवायचा असता तर हराम च्या मार्गांनी बी कमवू शकलो असतो, पण आपुन तसं नई केलं. करायचा काय हे ते करून? जर ते केलं असतं तर आत्तापर्यंत एक सोडून दोन तीन घर राहिले असते .. एक दोन गाड्या पण घेतल्या असत्या. पण मी खुश हे. जे दोन पैसे कष्टाने कमावतो त्यात आपलं समाधान हे. शेवटी तुम्ही ठरवायचं तुम्हाला जीवनात काय पाहिजे.
बरोबर आहे.
आता हि रिक्षा १३ वर्ष मेहुण्याकडं होती, १५ वर्षापासून माझ्याकडं हे. त्याच्याच परमिट वर काम केलं. त्याचे सगळे हफ्ते फेडले. आता काही दिवसांपूर्वी रिन्यू केलं परमिट. आता ते नवीन कायदे निघालेत ना. आपुन आता नवीन लोन करणार. दीड लाख खर्च हे त्याला. हि गाडी वापस करायची आन नवीन घ्यायची. मेहुण्याला परमिट द्यायचं. मला बरेच जन म्हणले, तुम्ही एवढे सगळे हफ्ते फेडले आता त्याला कशाला देतात परमिट. म्हणलं काय खौद्या ना पैसे खाल्ले तर.. कोण खाणार.. बहिणीचा नवराच खाईन ना… आन आपुन कितीबी पैसे वाचून ठेवले ना, नशिबात जर लेह्लं असल तर कोणीपण चुना लावून जातो.
🙂 हो..
पोराला म्हणलं तुला घर नाई घेऊन देणार पण डाऊनपेमेंट ला मदत लागली तर माग. ते करू. त्याला घरबी आपूनच घेऊन दिलं तर तेनी काय करायचं? हेहे. खरय कि खोटं? त्याला.. घर बी जर आपुन दिलं.., तर तेनी काय करायचं. बर आपल्याला त्याच्याकडून काई अपेक्षा नाही. बायकोलाही तेच सांगितलं. तो आपला सांभाळ करीन नाई करील हि त्याची इच्छा राहिली. आपुन अपेक्षा नाही ठेवायची. तो करील.. नक्की करील .. नाई असा नाई. पण आपुन अपेक्षा नाई करायची. कसं असतं अपेक्षा ठेवली अन ती जर पूर्ण झाली नाई, का मग नाराजी येती. अपेक्षाच नाई करायची. आपलं आपण कर्तव्य करायचं. शेवटी पोरांची पण आपली लाइफ असते त्यांना पण या वयात एन्जोय करावं वाटतं, यांना प्राइवसि पाहिजे असती. पालकांनी पण ह्या वयात पोरांच्या जास्त मागं नाही लागलं पाहिजे. हा सांगा.. पण १८-२० पर्यंत. नंतर नाई. त्यांना थोडी मोकळीक दिली पाइजे. पोराला आपुन सांगत असतो.. हे बघ हे चूक हे बरोबर.. तुला काय करायचं तू बघ. तो तुझा निर्णय. हेहे.. आणि पोरांना पण जाणीव असते.. प्रत्येकाला जाणीव असते. नाई असं नाई..
खरं आहे.. 🙂
आमच्या भावाच्या पोरांची कहाणी जर वेगळी हे. पोरीला इंगीनिरिंग च्या डिप्लोमा ला टाकलं तिनी दुसराच डिप्लोमा केला. दुसऱ्या वर्षातच लव मेरेज केलं. जातीबाहेर लग्न केलं. ते मराठे. आम्ही परीट.
होका?..
पुतण्याची आणखी वेगळीच तऱ्हा.. त्याला डॉक्टर बनायचं होतं, तो यांकर झाला. यांकर नसतात का ते .. माईक हातात धरून बडबड करत असतेत..
😀 हो हो..
त्याचं असंच हे . थोड्या दिवस हे केलं का ते सोडणार दुसरं काहीतरी करणार … ते नाही जमलं का दुसरं काईतरी. त्याला सांगितलं तू एक काहीतरी धर.. पण नाई. माणसाला त्याची लाइफ कुठं घेऊन जाईन काई सांगता येत नाई …!
हे तत्वज्ञान आणखी काही वेळ चालू राहावं असं वाटत होतं पण तेवढ्यात पुणे आईटी पार्क आलं. मी मीटर चेक न करता त्यांनी मागितलेले पैसे दिले आणि हस्तांदोलन करून निघून आलो. पण ती व्यक्ती आणि विनासक्ती अजूनही लक्षात आहे.
I think a lot (I think). Aspiring writer/philosopher/psychologist.